रत्नागिरी : शहरातील आठवडी बाजार येथील श्री मोबाइल ॲण्ड टेककाॅम या दुकानात सीप ट्रंकिंग सिस्टम बसवून आंतरराष्ट्रीय काॅलिंग सेंटर चालवणाऱ्या दाेघांना साेमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दाेघांची जामिनावर मुक्तता केली आहे. त्यांना दर गुरुवारी शहर पाेलीस स्थानकात हजर राहण्याची व पुराव्यांमध्ये काेणतीही छेडछाड न करण्याच्या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पोलिसांनी सोमवारी संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, दाेघांच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करून याप्रकरणी कोणतेही संशस्यापद आणि दहशतवादी कृत्य करण्यात आलेले नाही. संशयित आरोपींनी शासनाचा कोणताही महसूलही बुडवलेला नाही, असे सांगितले. यावेळी न्यायालयात या सिस्टम व सीप ट्रंकिंगचे जिओ कंपनीचे बिल व बिल भरलेली पावती न्यायालयात सादर करण्यात आली.
त्यानंतर अलंकार अरविंद विचारे (३८, रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) आणि फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) या संशयित आरोपींची न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली. फैजल सिद्दीकी याच्यातर्फे ॲड. संकेत घाग तर अलंकार विचारे याच्यातर्फे ॲड. अविनाश शेट्ये यांनी काम पाहिले.