रत्नागिरी : सध्या कोरोना लस घेण्यासाठी आता पहिल्या डोसप्रमाणे दुसऱ्या डोससाठीही ऑनलाईन नोंदणी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. मात्र, कनेक्टिव्हिटीचा अडसर तसेच सरकारच्या पोर्टलमध्ये असलेला गोंधळ यामध्ये गरजू लाभार्थ्यांना ही लस मिळताना अडचणी येत आहेत. शासनाने ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
उंबरशेतमध्ये चोरी
दापोली : तालुक्यातील उंबरशेत येथे बुधवारी रात्री सुनील गोरिवले यांच्या दरवाजाचे कुलूप फोडून चोरट्याने २ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रभारींवर भार
रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षण विभागात विविध जागा रिक्त आहेत. यासाठी कुठलाही पाठपुरावा होत असलेला दिसून येत नाही. सध्या प्रभारींवरच शिक्षण विभागाचा कारभार अवलंबून आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी ही पदे सध्या प्रभारींकडे आहेत.
दोषींवर कारवाई
रत्नागिरी : शहरातील मिस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची पालकमंत्री अनिल परब यांनी दखल घेतली आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती अॅड. परब यांनी पत्रकारांना दिली.
रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण
दापोली : आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने महाड, लाटवण, विसापूर रस्ता दुरुस्तीसाठी ८४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या उपलब्ध झालेल्या निधीमुळे या रस्त्याचे अनेक वर्षे रखडलेले दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.