आबलाेली : शासनाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या शासन निर्णयाविरोधात संघटना राज्यभर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्ताने आवाज उठवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संताेष कांबळे यांनी दिली. गुहागर शाखेतर्फे आयाेजित केलेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी संघटनेच्या कामाविषयीही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना, तालुका शाखा गुहागरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जयंती महोत्सवाची सुरुवात केली. तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सभापती पूर्वी निमुणकर, संघटनेचे कोकण विभाग कार्याध्यक्ष राजेश गमरे, जिल्हा सचिव संतोष मोहिते, शिक्षक पतपेढीचे संचालक अनंत कदम, आबलोलीचे माजी सरपंच नरेश निमुणकर, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत झगडे, तालुकाध्यक्ष दीपक साबळे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते दीपक रेपाळ यांनी तथागत भगवान बुद्धांपासून ते अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत ज्या-ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या उध्दारासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी आणि या देशात समता निर्माण करण्यासाठी जे मोलाचे प्रयत्न केले त्याची माहिती दिली. तसेच महापुरुषांनी जे सामाजिक योगदान दिले आहे, त्यामुळेच आज आपण सन्मानाचे जीवन जगत आहोत, याचीही आठवण करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटना केवळ शिक्षकांसाठी काम करत नसून, विद्यार्थी शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यासाठी नेहमीच आग्रही राहील, याची माहिती दिली. तसेच सर्व आरक्षित घटकांनी आणि शिक्षकांनी या संघटनेत सहभागी होऊन सामाजिक न्याय हक्काचा लढा अधिक तीव्रतेने लढण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगितले. संघटनेचे सहसचिव वैभव पवार यांनी सर्वांचे आभार मानले.