खेड : खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी काहीशी चुरस निर्माण झाली आहे. दोन दिवस झाले तरी एकाही इच्छुकाने अद्याप आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. आमदार संजय कदम यांच्या तथाकथित शहर विकास आघाडीमध्येदेखील अद्याप शांतताच आहे. कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत एकमत होऊ न शकल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आघाडीकडे सध्या उमेदवारांची वानवा असून, मनसे व राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आघाडीची हवा निघून गेली आहे. शिवसेनेने मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. खेड नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान एरव्ही शिवसेना आणि काँग्रेस अशी सरळ लढत होत असे. गेल्या १० वर्षांमध्ये शिवसेना विरूध्द मनसे आणि राष्ट्रवादी अशा सरळ लढती झाल्या. आता प्रथमच २०१६मध्ये ही निवडणूक थेट शहर विकास आघाडीसह मनसे विरूध्द शिवसेना अशी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नामोनिशाण नसले तरी राष्ट्रवादी पुरस्कृत ही आघाडी असल्याने आणि या आघाडीने मनसेशी युती करण्याच्या शक्यतेने शिवसेना विरूध्द आघाडी अशी लढत होत आहे. वस्तुत: खेड शहरामधील विकासामध्ये शिवसेनेची अनेक वर्षाची नाळ जोडली आहे. शहराचा विकास कसा असतो, हे शिवसेनेने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. याच कार्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनीही रामदास कदमांवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत शहरवासीय शिवसेनेच्या पाठीशी राहणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेने आपल्या कार्यकालामध्ये काही रस्ते, पथदिवे आणि गटारांची काही कामे वगळता शहर विकासाच्या कार्यामध्ये फोर मोठे योगदान दिले नाही. कचरा डेपो ते ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य, असा त्यांच्या कामाचा क्रम राहिल्याने स्वच्छ शहर व सुंदर शहराची कल्पना आजही अधांतरीच राहिली आहे. स्मरणात राहील, असे काम मनसेने ४ वर्षांत केलेले नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर आणि तेही शासकीय योजनेचा निधी शिल्लक राहील, या भीतीने आणि या निधीचा विनियोग सत्तेत येणारा पक्ष आपल्या कामासाठी करणार असल्याच्या भावनेतून मनसेच्या सत्ताधाऱ्यांनी अखेरच्या एका वर्षात उर्वरित कामांना मंजुरी दिली. या कामांचे भूमिपूजनही उरकून टाकले. मनसेने काही सामाजिक उपक्रम राबविले असले तरीही याअगोदरच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलेली विकासकामे तुलनेने जास्त आहेत. तुलनात्मकदृष्ट्या शिवसेनेचे कार्य सरस ठरले आहे, अशा स्थितीत मनसेने चक्क राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीसोबत घरोबा करण्याचे ठरविल्याने आणि त्यादृष्टीने मनसेच्या वैभव खेडेकर यांनीही धोरणे आखायला सुरूवात केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. वैभव खेडेकर यांनी या आघाडीमध्ये जायला नको होते, अशी चर्चा खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही सुरू आहे. कार्यकर्त्यांशी याअगोदर याबाबत बोलणी करणे आवश्यक होती, असा सूरदेखील हे कार्यकर्ते आळवत आहेत. मात्र, याची दखल खेडेकर यांनी घेतली नसल्याचे शल्य अनेक कार्यकर्त्यांना आहे़ मनसेअंतर्गत ही द्विधा स्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीमध्येदेखील काही आलबेल नाही, तर काँग्रेसवासीय आजघडीला राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी काँग्रेसचे आसीफ खोत, मनसेचे शहर अध्यक्ष भूषण चिखले यांचे बंधू अभिजित चिखले, मनसेचे माजी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष कुंदन सातपुते यांनी रामदास कदमांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेसह या आघाडीलाच मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन दिवसात मनसेचे आणखी काही नगरसेवक आणि माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, मनसेसह शहर विकास आघाडी खिळखिळी होणार आहे. आघाडी होण्याआधीच बिघाडी होणार की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
आघाडीकडे उमेदवारांची वानवा
By admin | Published: October 26, 2016 11:35 PM