अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक असल्याने पक्षातील इच्छुकांची संख्याही अधिक आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांनी स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार याच नेत्यांकडे असल्याने त्यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, सध्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारीवरून घरातच वाद होण्याचे प्रसंग घडू लागले आहेत.शहराजवळच्या शिवसेनेचे वजन असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याच्या वडिलांनी पुन्हा मुलासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, घरी येताच त्याच्या भावाला तिकीट दिल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दोन भावातच जुंपली.
एवढ्यावरच न थांबत काका - पुतणेही एकमेकांसमोर उभे ठाकले. या प्रकारामुळे आता घरातच दोन गट निर्माण झाले आहेत. विद्यमान सदस्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घालण्यासाठी वडील उत्सुक आहेत. तर दुसरीकडे पुतण्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे घरातूनच आता घमासान सुरु झाले आहे.आरक्षणाकडे लक्षजिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण उशिराने पडणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाकडे डोळा ठेवून असलेले इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. मनासारखे आरक्षण पडले नाहीत तर काय करायचे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच महिला आरक्षण पडले तर काय? निवडणुकीत स्वत: उभे राहावे की घरातील महिलेला तिकीट द्यावे हा संभ्रमच आहे.