रत्नागिरी : पंढरपुरातून देवदर्शन करुन येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. हा अपघातरत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात बुधवारी (दि२१) रात्री घडली. अपघातात आठजण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सुरेश विठोबा जाधव, अरुणा अनंत डिंगणकर, सुप्रिया सुरेश जाधव, संदेश गुरव, सुषमा सुभाषचंद्र लिंगायत, सावली गुरव, प्रथमेश गुरव व सरिता गुरव (सर्व रा. संगमेश्वर, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.कार चालक महेश गंगाराम बांबाडे (५२, रा. लोवले पड्येवाडी, ता. संगमेश्वर) हा कार (एमएच ४३, एन ६६५५) मधून प्रवाशांना घेऊन १६ फेब्रुवारी राेजी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेला होता. देवदर्शन करुन लाेवले (ता. संगमेश्वर) येथे परतत असताना बुधवारी रात्री आंबा घाटात दख्खन गावापासून कोल्हापूरच्या दिशेकडे सुमारे २ किलाेमीटर अंतरावर वळणाचा अंदाज आला नाही आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात आठजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. याप्रकरणी कारचालक महेश बांबाडे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवदर्शनाहून परतताना कारला आंबा घाटात अपघात, संगमेश्वरातील आठजण जखमी
By मनोज मुळ्ये | Published: February 24, 2024 4:26 PM