लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ते दोघेही पहिल्या फळीतील कोरोना योद्धे. दोघांकडेही त्या-त्या क्षेत्राची जिल्ह्याची प्रमुख जबाबदारी. ते पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड. त्यांचे रोज दिवसातले अनेक तास कोरोनाविरुद्धच्या लढाईत जातात. घरी गेल्यानंतरही ही काळजी त्यांची पाठ सोडत नाही. घरात लहान बाळ आहे. त्यामुळे घरी गेल्यावर पूर्ण काळजी घेऊनच त्या चिमुकलीला जवळ घ्यावं लागतं.
डॉक्टर्स, पोलीस, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, वॉर्डबॉय असे अनेकजण कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीत राहून काम करत आहेत. त्यातही वैद्यकीय क्षेत्रातील लोक तर सतत डेंजर झोनमध्येच काम करत आहेत. या प्रत्यक्ष योद्ध्यांसह सामाजिक संस्थांचे हेल्पिंग हँडस्, पोलीस मित्र झालेले शिक्षक असे असंख्य लोक दुसऱ्या फळीत काम करत आहेत. पहिल्या फळीतील योद्धे आपली जबाबदारी म्हणून आणि दुसऱ्या फळीतील योद्धे आपली बांधिलकी म्हणून अडल्या - नडल्या लोकांसाठी मदतीचा हात घेऊन उभे आहेत.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड हे दोघेही पहिल्या फळीतील योद्धे. बंदोबस्त, मंत्र्यांचे दौरे, लॉकडाऊनची अमलबजावणी याची प्रमुख जबाबदारी म्हणून डॉ. गर्ग यांचा घराबाहेर जाणारा वेळ खूप आहे. लसीकरणाचे नियोजन, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील दवाखाने, तेथील सुविधा, त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी याची जबाबदारी डॉ. जाखड यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांचे कामही पहिल्या फळीतील आहे. जिल्ह्यातील उच्च अधिकारी असल्याने या दोघांनाही सतत लोकांमध्ये वावरावे लागते.
या जोडप्याला ‘याना’ नावाची दीड वर्षाची मुलगी आहे. म्हणूनच या दोघांनाही ऑफिसमधून घरी गेल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते. सर्व प्रतिबंधात्मक गाेष्टी करूनच त्यांना मुलीला जवळ घ्यावे लागते, तिच्याशी खेळता येते. तरीही थोडी काळजी, थोडी धाकधूक मनात असतेच.
असे अनेक कोरोना योद्धे पती-पत्नी आहेत की, ज्या दोघांनाही दिवसभर घराबाहेर काम करावे लागते. घरी आल्यानंतर आपल्या मुलांशीही थोडे सांभाळूनच राहावे लागते. या योद्ध्यांमुळेच कोरोनाविरुद्ध लढणे सर्वसामान्य माणसाला सोपे जाते. अशावेळी या योद्धांची काळजी घेणे, ही समाजाची जबाबदारी आहे.
..................
आमच्यासोबत सासू व सासरे राहत असल्यामुळे तेच आमचा मुलीची जास्त काळजी घेतात. मी व माझे पती आम्ही कोरोना फ्रंटलाईन वर्कर्स असल्यामुळे आम्ही घरी गेल्यावर खूप काळजी घेऊनच बाळाला जवळ घेतो. मी स्वत: ऑफिसमध्ये दोन मास्कचा वापर करते व ऑफिसमध्ये फिरताना किंवा कर्मचाऱ्यांना भेटताना काळजी घेऊनच सुरक्षित अंतर ठेवूनच भेटते. माझे पती पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे तेही तेवढीच काळजी घेऊनच लोकांना भेटतात. आम्ही दोघेही घरी आल्यानंतर खूप काळजी घेतो. ऑफिसचे कपडे तातडीने धुवायला देणे, सॅनिटायझरचा वापर करणे याला खूप महत्त्व आहे. व्यवस्थित फ्रेश झाल्यानंतरच आमच्या मुलीला आम्ही जवळ घेतो. आम्हा दोघांना कसलाही त्रास जाणवला तर कोरोनाची चाचणी करतो व अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहतो.
- डॉ. इंदुराणी जाखड
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी