रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळ कमी पडू लागल्याने खासगी रुग्णालयांचा आधार जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. मात्र, सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यास किंवा आरोग्य सुविधा कमी पडल्यास सामान्य माणसालाही खासगी रुग्णालयांचा दरवाजा ठोठावा लागतो. मात्र, खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागत असल्याने रोगापेक्षा इलाज भारी म्हणण्याची वेळ रुग्णावर येत आहे.
तालुका आणि जिल्ह्याचे ठिकाण रत्नागिरीत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय यासह तालुक्यात एक खासगी कोविड रुग्णालय, तीन खासगी डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर आणि अकरा काेरोना केअर सेंटर आहेत. सध्या या सर्व रुग्णालये आणि कोरोना सेंटरमध्ये मिळून एकूण १५०० बेड उपलब्ध आहेत. सध्या तालुक्यात १२७६ एवढे रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ३५५ रुग्ण गृहअलगीकरणात आहेत. मात्र, सध्या शासनाच्या आदेशानुसार ज्या रुग्णांमध्ये सौम्य व अजिबात लक्षणे नाहीत, अशांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश असल्याने सध्या रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे. मात्र, ज्यांना उपचारांची गरज आहे, असे रुग्ण ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णालयात दाखल होतात. मात्र, तिथले बिलाचे लाखो रुपयांमधील आकडे पाहून सामान्य रुग्णांचे डोळे कोरोनापेक्षा बरा झाल्यानंतर बिल पाहूनच पांढरे होतात.
रत्नागिरी तालुक्यात जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय आणि एक अपेक्स खासगी रुग्णालयात मिळून एकूण ४८० बेडची क्षमता आहे तसेच तीन जिल्हा कोरोना हेल्थ सेंटरमधील एकूण बेडची क्षमता ४५२ इतकी आहे. अकरा कोरोना केअर सेंटरची मिळून ९९५ बेडची क्षमता आहे. यापैकी तालुक्यातील तीन मोठ्या कंपन्यांनी स्वत:चे कोविड सेंटर सुरू केले आहे. या तीन कोरोना रुग्णालयांमध्ये जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयात मिळून ३६८ तर काहींना ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने अपेक्समध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या २९ आहे तसेच तीन कोरोना हेल्थ रुग्णालयांमध्ये सध्या १३६ रुग्ण उपचार घेत आहेत. ११ कोरोना केअर सेंटरपैकी शासकीय सेंटरमध्ये ३४१ तर खासगीमध्ये ४८ रुग्ण उपचार घेत आहेत.