रत्नागिरी : युनेस्कोतर्फे जागतिक स्तरावर जनजागृतीसाठी दरवर्षी जागतिक वारसा दिन दि.१८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘जटिल भूतकाळ व वैविध्यपूर्ण भविष्य’ही थीम घेण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातर्फे ‘कातळशिल्पासह सैनिकी स्थापत्याचा’ प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कोकणच्या कातळशिल्पांना भविष्यात सर्वोच्च स्थान प्राप्त होणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे एकूण १८ प्रस्ताव नामांकनासाठी दाखल झाले होते. त्यातील चार प्रस्तावांना मान्यता दर्शविण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या दोन प्रस्तावांची निवड झाली आहे. कातळशिल्पासह सैनिकी स्थापत्याचे प्रस्ताव नामांकनासाठी दाखल करण्यात आले आहेत. युनेस्कोकडून या प्रस्तावांना मंजुरी मिळताच तज्ज्ञांच्या टीमकडून त्यावर स्वतंत्र प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
सैनिकी स्थापत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग कुलाबा आदी किल्ल्यांचा समावेश आहे.
पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे व इनटॅक संस्थेच्या मदतीने जागतिक वारसा स्थळासाठी युनेस्कोकडून नामांकन मिळविण्यासाठी विस्तृत प्रस्ताव पाठविण्यात आला हाेता. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व जागतिक पातळीवर वाढले, तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ सुरू होऊन स्थानिक अर्थकारणात भर पडेल. तसेच कातळशिल्पांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे दुर्लक्षित कोकणचे सड्यांनाही नावलाैकिक लाभेल. अश्मयुगीन कातळशिल्पांमुळे कलेचा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास समोर येणार आहे. कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरूण उक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तसेच गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पांना नामांकन प्राप्त झाले आहे. कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून युनेस्कोकडून मान्यता प्राप्त होताच जागतिक स्तरावर कातळशिल्पांना स्थान प्राप्त होऊन जिल्ह्याच्या नावलाैकिकात आणखी भर पडणार आहे.
कोट घ्यावा
२०१४-१५ पासून सुरू झालेल्या कातळशिल्प शोधमोहिमेस यश प्राप्त होत आहे. देशपातळीवर दखल घेण्यात आल्यानेच युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मान्यतेनंतर जागतिक स्तरावर काेकणच्या सड्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त होईल. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, तसेच इतिहासप्रेमींचे सहकार्य लाभत आहे.
- सुधीर रिसबूड, कातळशिल्प शोधकर्ते