असुर्डे : मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणामध्ये हाहाकार उडविला आहे. खेरशेत ब्राम्हणवाडी येथील लोखंडी पूल वाहून गेल्याने या वाडीचा गावाशी संपर्क तुटला आहे. हा पूल जीर्ण झाल्यामुळे पंचायत समिती सदस्य चंद्र्रकांत जाधव यांनी बांधकाम खात्याशी याबाबत पत्रव्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. परंतु, सबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांंचा संपर्क तुटल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव यांनी केला आहे. पाण्याचा इतका प्रचंड वेग होता की, हा पूल ४० फूट पिलरसह वाहून गेला आहे. रात्रीची वेळ असल्याने मनुष्यहानी टळली. या पुलाचा वापर ब्राम्हणवाडीबरोबरच कोकरे प्रशालेतील मुले, कोकरे येथील मोहल्ला, बुदरवाडी, पोरनाकवाडी येथील ग्रामस्थ करतात. पावसामुळे गावातील शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. तसेच शेताचे बांध व रस्त्यांचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. खेरशेत येथे वडाचा महाकाय वृक्ष पडल्याने मुंबई - गोवा मार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. जेसीबीच्या सहाय्याने हा वृक्ष बाजूला करुन शनिवारी सकाळी वाहतूक सुरळीत करण्यात आली. (वार्ताहर)
खेरशेत येथील लोखंडी पूल गेला वाहून
By admin | Published: September 25, 2016 12:53 AM