देवरुख : देवरुख-संगमेश्वर महामार्गावरील करंबेळे खाकेवाडी येथे मंगळवारी सकाळी तवेरा व खासगी आराम बस अपघातप्रकरणी तवेराचालकावर मंगळवारी रात्री देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद पोलीस नाईक संतोष सडकर यांनी दिली आहे. चेतन मोहन देवर्डे (२३, रा.अकोला, जि. बेळगाव, रा. कर्नाटक) हा आपल्या ताब्यातील तवेरा कार घेऊन देवरुखहून दापोलीच्या दिशेने जात होता, तर प्रगती खासगी आराम बस ही मुंबईहून देवरुख या दिशेने येत होती. अपघाताची खबर मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेतन देवर्डे यांनी तवेरा वाहन भरधाव वेगाने चालवून चुकीच्या बाजूला जाऊन खासगी आराम बसला धडक दिली. अपघात करून अपघातात जखमींच्या दुखापतीस व दोन्ही वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तवेराचालक चेतन देवर्डे याच्यावर मंगळवारी रात्री देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.