आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २२ : पालीजवळील वळके ग्रामपंचायतीचे सरपंच दोन गटामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत़ तसेच या ग्रामपंचायतीमध्ये जातीय वाद चालतो, असा खळबळजनक आरोप पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी भरसभेत केल्याने संपूर्ण सभागृह अवाक् झाले़ वळके ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्ता अडविल्याचे प्रकरण जोरदार गाजले़रत्नागिरी तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या वळके - बौध्दवाडी ते रमेश पांडुरंग सावंत यांच्या घरापर्यंतचा रस्ता काही लोकांनी रस्त्यावर बांध घालून बंद केला होता़ सन २००४मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यात आले होते़ या रस्त्याची नोंद २६ नंबरला करण्यात आलेली असल्याचे सदस्य सावंत यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले़ या रस्त्याबाबतचा निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने देण्यात आलेला असतानाही तो रस्ता अद्याप मोकळा करुन देण्यात आलेला नाही़ या रस्त्याच्या कामासाठी आमदार उदय सामंत यांनी २ लाख ६० हजार रुपये दिले आहेत़ग्रामपंचायतीला अधिकार असतानाही वळके सरपंचांनी अद्याप कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला़ त्याचबरोबर आतापर्यंत वळके ग्रामपंचायतीमध्ये बौध्द आणि कुणबी समाजाचा एकदाही सरपंच झालेला नाही़ सर्व सरपंच मराठा समाजाचे झाले आहेत़ तसेच या ग्रामपंचायतीचे सरपंच दोन गटामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असून, येथे जातीयवाद चालतो, असा गंभीर आरोप सावंत यांनी भरसभेत केला़ या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण गावात नव्हे तर राज्यभरात उमटतील, असा इशाराही सावंत यांनी भरसभेत दिला़ यावेळी सदस्य अभय खेडेकर यांनी हे प्रकरण गंभीर असून, यामध्ये प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे़ तसेच सरपंच, ग्रामसेवक यांना रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी खेडेकर, सावंत यांनी यावेळी केली़ सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते पंचायत समितीच्या सभेला कायम दांडी मारतात़ प्रतिनिधी पाठवून पंचायत समितीचे आदेश धाब्यावर बसविण्याचे प्रकार थांबलेले नाहीत़ त्यामुळे याप्रकरणी आमदार उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे उपसभापती सुनील नावले यांनी सभागृहात स्पष्ट केले़ तसेच वेळ आल्यास कायदाही हातात घेऊ, असा इशाराही उपसभापतींनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिला़ त्यानंतर संबंधित अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला़
रस्ते खोदाई करणाऱ्या खासगी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला़ सदस्यांनी एस़ टी़च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले़. सभांमध्ये निर्णय घेऊनही ग्रामीण भागातील गाड्या अद्याप सुरु झालेल्या नसल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला़ त्याचबरोबर स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता, स्वच्छतागृहात महिलांकडून करण्यात येणारी पैशांची वसूली याप्रकरणी तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना एस़ टी़च्या अधिकाऱ्यांना दिल्या़ तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आदेश दिले़