प्रशांत सुर्वेमंडणगड : अकरावी, बारावीत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयातच देण्याची घोषणा समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली होती. या उपक्रमाची सुरुवात संविधान दिनानिमित्त मंडणगड येथून करण्यात येणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र वाटपाचा हा ‘मंडणगड पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे.समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी मंडणगडातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात सत्कार समारंभासाठी आले होते. अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. ते मिळविण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालय स्तरावरच देण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले होते.त्याप्रमाणे संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांमधून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने समाजकल्याण विभागाने आवश्यक कागदपत्रे तयार करून घेतली आहेत. कागदपपत्रांच्या पूर्ततेनंतर हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. मंडणगडातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शनिवार, २६ डिसेंबर २०२२ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुणे बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये, जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह, दादा इदाते, जिल्हा जात प्रमाणपपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना पडियार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे सचिव सुमंत भांगे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.काय आहे पॅटर्नजात पडताळणी प्रक्रिया विनादिक्कत होण्यासाठी महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जातात. समन्वयक त्यातील त्रुटी जागेवरच दूर करून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करतात. तेथेच तपासणी होत असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्चामध्ये बचत होते. विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वीच जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे
जात वैधता प्रमाणपत्र ‘मंडणगड पॅटर्न’ राज्यभर, काय आहे पॅटर्न..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 1:46 PM