परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी येता-जाता कोरोना चाचणी गरजेची आहे. काही देशामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणाचा सक्ती आहे. तर काही नागरिक अन्य राज्यात विमानाने येऊन आपल्या घरी परतत आहेत. यामुळे विलगीकरणास फाटा मारत शासन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. काही देशांनी विलगीकरणच बंद केले आहे. मात्र कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांनाच विमानातून प्रवासासाठी प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विमानातून प्रवास करणारी मंडळी शंभर टक्के कोरोना चाचणी केलेले असल्याने संसर्गाचा धोका कमी होत आहे. परदेशात नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक असलेली मंडळी सुट्टीसाठी मायदेशात परततात. मोजकेच दिवस सुट्टी असल्याने विलगीकरणासाठी विशेष महत्त्व देत नाहीत. विलगीकरण चुकविण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातात. मात्र हे कशासाठी? परदेशातील निर्णय पालन करण्यासाठी असतात तर मायदेशातील नियम धुडकावण्यासाठी असतात का? अशी शंका येते.
परदेशात काम करीत असताना, तेथील नियमावली व त्याचे पालन काटेकोरपणे करावे लागते. मात्र ही मंडळी मायदेशात आल्यानंतर परदेशातील नियमांचे गोडवे गात असतात. गोडवे गाणे जरी योग्य असले तरी आपल्या देशातील कायद्याचे पालन करणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे, याची जाणीव या मंडळींना का बरे होत नाही?
कोरोना रुग्ण वाढत असले तरी लग्नसमारंभातील गर्दी काही कमी होत नाही. ५० लोकांमध्ये कार्य उरकण्याची सूचना असतानाही, गर्दी काही कमी होत नाही. संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापर सक्तीचा आहे. विनामास्क कारवाई होऊ नये यासाठी मास्क हनुवटीला अडकवून खुलेआम हिंडणारी मंडळी कमी नाहीत. हेल्मेट वापरणारी कित्येक मंडळी तर मास्कच वापरत नाहीत. दुचाकीवरून जातात रस्त्यात थुंकण्याचेही प्रकार कमी झालेले नाहीत. एकूणच काय तर कोरोना कुठे आहे? याच आविर्भावात मंडळी वावरत असतात. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टन्सिग गरजेचे आहे. परंतु कोरोनाबाबत गांभीर्य बाळगण्याऐवजी बेफिकिरीने वागणेच वाढले आहे.
पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू असून कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून शाळा भरविल्या जात आहेत. लहान मुले शाळेत येता-जाता मास्क वापर प्राधान्याने करीत आहेत. शाळेत सॅनिटायझर सुविधा उपलब्ध असली तरी प्रत्येक मुलांच्या दप्तरात पालकांकडून सॅनिटायझरची बाटली दिली जात आहे. काही पालकांची बेफिकिरी वाढू लागल्यानेच मुलांमध्येही हा बदल दिसू लागला आहे. शाळेच्या आवारात मास्क सक्तीने वापरला जात असला तरी शालेय आवाराबाहेर आल्यानंतर मास्क काढला जातो. एखाद्या जागृत नागरिकांनी याबाबत विचारले तर उलट उत्तरे दिली जातात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दररोजची वाढती संख्या व त्याचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. लाॅकडाऊनचा फटका सर्व क्षेत्रांना बसला होता. कित्येक कुटुंबे विस्कळीत झाली. एकूणच अनुभव ताजा असल्याने प्रत्येकांने गांभीर्याने वागले तर कोरोनाचा धोका नक्की टळू शकेल; मात्र याबाबत प्रत्येकाने स्वत:पासून सुरू करण्याची आवश्यकता आहे.