गुहागर /असगोली : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे सेंटर सुरू करण्यासाठी वेळणेश्वरचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज, सोमवारपर्यंत कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या हालचाली महसूल आणि आरोग्य विभागात गतिमान झाल्या आहेत.
एप्रिल २०२० मध्ये वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले हाेते. तब्बल सात महिन्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये शासनाने ही इमारत पुन्हा संस्थेच्या ताब्यात दिली. पुन्हा एकदा सहा महिन्यांनी हीच इमारत कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचे पत्र गुहागरच्या तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यानंतर कार्यवाही सुरू करण्यात आली असून, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तलाठ्यांना सोबत घेऊन महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. तसेच तहसील कार्यालयातून आरोग्य विभागालाही पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तालुका आरोग्य विभागातून कोविड केअर सेंटरमधील व्यवस्थांच्या उभारणीसाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्यावर्षी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था सुरुवातीला मार्गी लागली नव्हती. त्यानंतर हेदवीतील उदय जाधव यांच्याकडून रुग्णांना भोजन व चहा, नाष्टा पुरवला जात होता. त्यांच्या बिलापैकी सुमारे तीन लाख २७ हजार इतकी रक्कम शासनाने दिलेली नाही. कोविड केअर सेंटर संदर्भातील अनुदान न आल्याने दुसऱ्या टप्प्यातील अनेक बिले देणे बाकी आहे, अशी माहिती महसूलमधील अधिकाऱ्यांनीच दिली. त्यामुळे नव्याने कोविड सेंटर सुरू करताना आधीची बिले अदा करावी लागणार आहेत. त्याचबराेबर सेंटरचे व्यवस्थापन, कोविड रुग्णांचा व बायो मेडिकल कचरा, तेथील शिल्लक अन्नपदार्थांची विल्हेवाट न लागणे, पाणी व्यवस्था, आदी अनेक मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले होते. या सर्व त्रुटी दूर करण्याचे आव्हान तालुका प्रशासनासमोर आहे.