राजापूर :
तालुक्याच्या पूर्व परिसरातील रायपाटण ग्रामीण रुग्णालयात काेविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत हाेती. ही मागणी आराेग्य विभागाने पूर्ण केली असून, साेमवार (५ एप्रिल)पासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळात लसीकरण केले जाणार आहे.
राजापूर तालुक्यात केवळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व परिसरातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र नसल्याने अनेकांची गैरसाेय हाेत हाेती. दरम्यान, रायपाटण येथे लसीकरण केंद्र सुरू हाेण्यासाठी विविध पक्षीय मंडळींनी पुढाकार घेतला हाेता. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार सोमवारी या रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
रायपाटणचे सुपुत्र संतोष कोलते यांनी लसीकरणाच्या कामासाठी संगणक उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमाला डॉ. व्ही.जी. चव्हाण, डॉ. समाधान चमगर, करक आरोग्य केंद्राचे सुपरवायझर के.बी. पाटील, रायपाटणचे ग्रामस्थ प्रदीप नेवरेकर, प्रसाद पळसुलेदेसाई, प्रकाश पाताडे, महेश गांगण, कुणाल गांगण, तात्या गांगण, मंगेश पराडकर, बाळा जोशी, विनायक निखार्गे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश चांदे, राजेंद्र जोशी, गणेश पांचाळ, बाळ माटल, स्वराज कारेकर, संदेश कारेकर, मनोहर खोचाडे उपस्थित होते.