चिपळूण तालुक्यातील नायशी येथील ज्येष्ठ नागरिकांना वालावलकर रुग्णालयात काेविड लस देण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील नायशी गावातील २० ज्येष्ठ नागरिकांनी नायशी ग्रामपंचायत उपसरपंच संदीप घाग याच्या प्रयत्नाने मंगळवारी डेरवण येथील वालावलकर रुग्णालय येथे कोविड प्रतिबंधक लस टोचून घेत शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला. नायशीच्या सरपंच खतीजा हुसेन काझी (वय ७४) यांच्यासह ९० वर्षांचे राजाराम घाग यांनी ही लस टोचून घेतली.
डेरवण रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. सुवर्णा पाटील यांच्या सहकार्याने नायशी मोहल्ला, टेपवाडी, बाजीवाडी येथील ग्रामस्थांसह नायशी येथील २० ज्येष्ठ नगरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. त्याचबरोबर या २० नागरिकांची मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना पुढील लस २८ दिवसांनंतर रुग्णालयातर्फे देण्यात येणार आहे.
नायशी गावातील ग्रामस्थांसाठी रुग्णालयातर्फे बसची व्यवस्था करण्यात आली हाेती. लस टोचून घेतल्यानंतर रुग्णांना १ तास डेरवण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. लसीकरण मोहीम पार पाडण्यासाठी डेरवण रुग्णालयाचे कर्मचारी सचिन धुमाळ, दीपा गवस, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच उपसरपंच संदीप घाग, माजी उपसरपंच अमजत काझी यांनी या मोहिमेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले.