रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा आदेश देणारे पालकमंत्री अनिल परब यांची व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली असून, त्या क्लिपची तसेच पोलीस अधीक्षकांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली.
बुधवारी भाजपच्या येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांचा घात त्यांच्या शेजारी बसलेल्यांनीच केल्याचा टोलाही हाणला. झालेल्या प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री राणे यांची चौकशी केल्याचेही ते म्हणाले.
यावेळी जठार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या कामाच्या पद्धतीवरही तीव्र आक्षेप घेतला. ते शिवसेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे वागत होते. अनेक ठिकाणी पोलिसांच्या देखरेखीखाली पोस्टर्स फाडली जात होती. मात्र पोलिसांनी काहीच केले नाही. आम्ही अटकेला घाबरत नव्हतो. पोलिसांनी अटक करावीच हे आमचे आव्हान होते. मात्र रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक अफगाणिस्तानच्या तालिबान्यांप्रमाणे वागत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पालकमंत्री अनिल परब यांचा घात कोणी केला, उजवीकडे बसलेल्यांनी की डावीकडे बसलेल्या माणसांनी, असा प्रश्न जठार यांनी केला. या डाव्या-उजव्या ठिकाणी बसलेल्यांना माईक सुरू असल्याचे माहीत होते. मात्र त्या दोघांनाही परबांचा काटा काढायचा होता. त्यांनी आपला राग काढला, असा टोला जठार यांनी हाणला.
सरकारचे जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम आहे; परंतु १०० कोटींचा मलिदा प्रत्येक महिन्यात द्या सांगणारा पालकमंत्री असेल तर त्यांच्याकडून आपल्या वेगळ्या आपेक्षा नव्हत्या. जनआशीर्वाद यात्रेच्या दिवशीच जिल्हा नियोजन समितीची बैठक लावून त्यांना भाजपसाठी खड्डा खणायचा होता. मात्र त्या खड्ड्यात अनिल परब यांच्याच दोन्ही सहकाऱ्यांनी त्यांना ढकलले. त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील, असेही त्यांनी सांगितले.