रत्नागिरी : यंदाही कोरोना महामारीचे संकट आहे. प्रथेप्रमाणे गणेशोत्सव साजरा व्हायला हवा. सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळून यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला असल्याची माहिती दिली. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफीचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच १ तारखेपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सामंत म्हणाले, जिल्ह्यात यंदा एक लाख ६६ हजार खासगी, तर ११४ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोनाचे संकट अजून कायम असल्याने कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. यावेळी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी देण्याचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे. केंद्र शासनाच्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे आहेत. हे खड्डे तत्काळ भरण्याच्या सूचना दिल्या असून, कामाला सुरुवात झाली असल्याचे सामंत यांनी सांगितले.
महामार्गावर चाकरमान्यांच्या स्वागतासाठी १८ ठिकाणी वेलकम पॉइंट असणार आहेत. तसेच रेल्वेस्थानकातही तशी यंत्रणा असणार आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेतली. दोन डोस घेतलेले, एक डोस घेतलेले, अशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याबाबतची नियमावली ते जाहीर करतील. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्यांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होणार होईल. मुंबइहून येणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले.
गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी प्रत्येक पालिकेने कृत्रिम तलाव तयार करावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र आहेत, त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याची दुरुस्ती करून मार्ग सरळ करणे किंवा सावधानतेचा फलक लावणे आदी अनेक सूचना दिल्या असल्याचेही यावेळी सामंत यांनी सांगितले.