दापोली : तालुक्यातील कुडावळे आदिवासीवाडी येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी बिरसा फायटर्सचे संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले. एस.बी. खरात कृषी अधिकारी दापोली यांनी मनोगत व्यक्त केले. बिरसा फायटर्सच्या महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, मालती पवार, आदिवासीवाडीप्रमुख शिवाजी पवार, दापाेलीचे तालुकाध्यक्ष विठोबा जगताप, तालुका सचिव महेश वाघमारे, विजय पवार, कुडावळे सरपंच कदम, शिक्षक, वेरळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खामकर उपस्थित होते. शाळेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीलकुमार पावरा यांनी केले.
त्यानंतर मैदानावर गोफण स्पर्धा घेण्यात आली. गोफण स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी भाग घेतला. कुडावळे आदिवासीवाडीतील महिलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. त्यानंतर आदिवासी मुलींनी आदिवासी नृत्ये सादर केली.
मराठी शाळेजवळ मौजे दापोली येथे ही आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे आदिवासी दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख गुलाबराव गावित, मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी, दत्तात्रेय वाघमारे, पिंगला पावरा, संगीता पवार, अरुण वळवी, पोलीस कर्मचारी, सुशीलकुमार पावरा उपस्थित होते.