रत्नागिरी : ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. याच अनुषंगाने रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, भारतीय तटरक्षक दल रत्नागिरी व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला.
जगभरातील महासागरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्त्व जपले जावे, असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते.
याचा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘जीवन आणि उदरनिर्वाह’ याविषयी वरिष्ठ वैज्ञानीक डॉ. अभय बी. फुलके (सूक्ष्मजीवविज्ञान विभाग, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, प्रादेशिक केंद्र, अंधेरी, मुंबई) यांनी मार्गदर्शन केले. डॉ. फुलके यांनी जागतिक महासागर दिनानिमित्त जीवन व उपजीविका, सागराचे महत्त्व, महासागराचे प्रदूषण व उपाय, तसेच मत्स्यसाठा कमी होण्याचे नैसर्गिक कारण व स्वत: स्वयंसेवक होऊन कशा पद्धतीने हे प्रदूषण थांबवू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले. के. एल. अरुण (डी.आय.जी, स्टेशन कमांडर, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी) यांनी जागतिक महासागर दिनाचे महत्त्व पटवून दिले. भारतीय तटरक्षक दल आणि मासेमार यांचे नाते कशाप्रकारे एकमेकांशी जोडले गेले आहे याची माहिती दिली. भारतीय तटरक्षक दलाकडून सागरी सुरक्षेची साधने व त्याचा योग्य उपयोग याचे सादरीकरण केले. के. एल. अरुण यांनी भारतीय तटरक्षक दल नेहमीच मासेमारांच्या सुरक्षेसाठी तत्पर असल्याची माहिती दिली. कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ राज्य समन्वयक दीपक केकाण यांनी प्रास्तविककेले. सूत्रसंचालन रिलायन्स फाउंडेशनचे मुंबई पालघर रायगडचे व्यवस्थापक तेजस डोंगरीकर यांनी केले. रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी सिंधुदुर्ग व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे औरंगाबाद जिल्हा व्ययस्थापक मनोज काळे यांनी सांभाळली. नियोजन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक गणपत गावडे, चिन्मय साळवी, निरंजन घुले व योगेश मेंदडकर यांनी केले.