रत्नागिरी : शहरातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिर्की एकादशी साजरी करण्यात आली. पहाटे २.३० वाजता श्री विठ्ठलाची विधीवत पूजा पार पडली. यावेळी विठुरायाचा जयघोष करण्यात आला.
यंदा पूजेचा मान संतोष कुलापकर व सवी कुलापकर या जोडप्याला मिळाला. त्यानंतर पहाटे ४.३० वाजता काकड आरती करण्यात आली. संपूर्ण दिवसभर भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले.
कोरोना महामारीचा संसर्ग काही अंशी कमी झाल्याने राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कार्तिकी यात्रा करण्यास शासनाने परवानगी दिली. पंढरपूरातील विठ्ठलाचे मुखदर्शन देखील सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. यंदाचा श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) या दापत्याची निवड झाली आहे. या दाम्पत्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी, राज्यात सुख शांती नांदावी. वारीची परंपरा कायम सुरू राहावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाकडे साकडे घातले.