रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या दोन दिवसांत ते नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. शहरातील आरोग्य मंदिर येथील नगर परिषद दवाखान्यात हे केंद्र सुरू केले जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी चर्चा करून हे कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात रुग्णसंख्या चौपट होण्याची भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली होती. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नगर परिषदेतर्फे कोरोना केंद्र सुरू निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात अद्ययावत कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे.
त्याठिकाणी बेडची सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम, औषधसाठा, रुग्णवाहिका, रुग्णांसाठी जेवण, नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत नियोजन सुरू आहे. नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी त्यासाठी विशेष प्रयत्न करीत असून तातडीने कोविड केंद्र रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.शुक्रवारी नगर परिषद कर्मचाऱ्यांतर्फे या रुग्णालयाची साफसफाई करण्यात आली. पाण्याची, विजेची सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. येथे तीस बेड उपलब्ध आहेत. तेथे सेवा देण्याबाबत खासगी डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. नर्सेस, वॉर्डबॉय, आरोग्य कर्मचारी याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने हे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी त्यात विशेष लक्ष घातले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे नगर परिषदेच्या रुग्णालयात सुसज्ज कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक सुविधांची उपलब्धता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत कोरोना केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.- प्रदीप साळवी,नगराध्यक्ष, रत्नागिरी.