राजापूर : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने रविवारी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना या पथकाने भेट दिली. या पथकाने तौक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत व त्यानंतर राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे तसेच सर्वच विभागांच्या प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले.
अशोककुमार परमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आले होते. त्यांच्यासोबत समन्वयक म्हणून विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती कोकण विभागाचे महसूल उपायुक्त मकरंद देशमुख यांनी केली होती. केंद्र शासनाचे हे पथक कोकणातील पाच जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे. रविवारी सकाळी या पथकाने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे महावितरणच्या झालेल्या वीजखांब व अन्य नुकसानाची तसेच दुधवडकर यांच्या नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. त्यानंतर तुळसुंदे-होळी येथील खडपे यांच्या घराची तसेच त्यानंतर कुवेशी येथील ताम्हणकर यांच्या सुपारी बागेच्या झालेल्या नुकसानाची पाहणी या पथकाने केली. कुवेशी येथून हे पथक कुणकेश्वर येथे रवाना झाले.
या पथकामध्ये अशोककुमार परमार, अभयकुमार, दीपक गवळी, आर. पी. सिंघ, देवेंद्र चाफेकर, अशोक कदम तसेच समन्वयक म्हणून ठाणे येथील रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, मुंबई तहसीलदार अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार प्रशांत सावंत, तहसीलदार वीरसिंग वसावे, भांडुपचे तहसीलदार रेवण लेंभे, घाटकोपरचे तहसीलदार अविनाश कोष्टी आदी उपस्थित होते.