अडरे : चिपळूण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती सभापती रिया कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आढावा घेण्याची माेहीम सुरू केली आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील कोरोनाबाधित रुग्ण, त्यांच्यावर सुरू असणारे उपचार याचा आढावा त्या घेत आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोना सेंटर तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक लोक आयसोलेशनमध्येच आहेत. अशा रुग्णांना त्या त्या विभागातील प्राथमिक केंद्रातून वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी सभापती रिया कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तालुक्यातील वहाळ, सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन माहिती घेतली. रुग्णांना चांगले उपचार द्या, अशा सूचना केल्या. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर काही समस्या मांडल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, माजी सरपंच शौकत माखजनकर, सुभाष सावंत, माजी सभापती सुरेश खापले, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.