देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील चैतन्य अविनाश पाध्ये याने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ३२५० किलाेमीटर अंतर चालून ‘नर्मदा परिक्रमा’ पूर्ण केली आहे. चैतन्यचे धामणी - गोळवली येथे आगमन होताच ग्रामस्थांनी धामणी गणेश मंदिर ते गोळवली अशी त्याची स्वागत मिरवणूक काढली. एवढ्या छोट्या वयात चालून ‘नर्मदा परिक्रमा’ पूर्ण करणारा चैतन्य हा कोकणातील पहिलाच युवक ठरला आहे.
नर्मदा परिक्रमा चालत पूर्ण करण्याचा प्रकार सर्वाधिक आव्हानात्मक मानला जातो. गोळवली येथील अविनाश पाध्ये यांचा मुलगा चैतन्य याने आपले माध्यमिक शिक्षण संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीत असतानाच त्याने ‘नर्मदा परिक्रमे’विषयी वाचल्यावर ही परिक्रमा करण्याचा निश्चय केला होता.आरवली येथील पाटणकर नावाचे गृहस्थ परिक्रमा करुन आले होते. त्यांच्याकडे जाऊन परिक्रमेबाबत माहिती घेतली. पाटणकर यांनी परिक्रमा हा स्वतः घ्यायचा अनुभव आहे, असे चैतन्यला सांगितल्याने चैतन्यला परिक्रमेबाबत अधिक प्रेरणा मिळाली. नर्मदा परिक्रमेला जायचे म्हणजे आई वडिलांची परवानगी मिळणे अधिक महत्त्वाचे होते. आई वडिलांची परवानगी अगदी सहज मिळाली. अखेर १३ नोव्हेंबर २०२१ रोजी ओंकारेश्वर येथून संकल्प सोडून चैतन्यने परिक्रमेला सुरुवात केली.
पाच महिन्यांनी नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण
पाच महिन्यांनी २५ एप्रिल २०२२ रोजी चैतन्यची नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण झाली. चैतन्यचे वडील संगम गणेश मंदिरात पुजारी म्हणून सेवा करत आहेत. आई धनश्री हिने चैतन्यचे धामणी येथे आगमन होताच आनंद अश्रुंनी त्याचे औंक्षण करुन आशीर्वाद दिले. आपण केलेली गणेशाची सेवा हीच चैतन्यसाठी मोठी ताकद होती, असे मत त्याचे वडिल अविनाश पाध्ये यांनी व्यक्त केले.
चालून चालून तळ पायाला आले फोडचालता चालता तळ पायाला दहा बारा फोड आले. त्यावर काय उपाय करायचा हे माहित नसल्याने मी तसाच चालत होतो. शुलपाणी आश्रमात पोहाेचल्यानंतर येथे आलेल्या परिक्रमावासीयांमध्ये एक डॉक्टर होते. त्यांनी सुईने हळूवारपणे सर्व फोड फोडले आणि माझे दु:ख हलके झाले. त्यांनीच माझ्या फोडांना तेल लावून माझ्याजवळ सुई आणि कापूस दिला. पुढील प्रवासात आपण अन्य परिक्रमावासीयांच्या पायाला आलेले फोड फोडून दिले.