लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील मांडकी बुद्रुक येथील बौद्धवाडीत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने वाडीतील बहुतांशी लोक महिनाभर घरीच होते. दैनंदिन मजुरी करून कुटुंब चालविणारे लोकच घरी थांबल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कुुटुंबीयांच्या मदतीसाठी बौद्धवाडीतील मुंबई मित्रमंडळासह, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावातील दानशूरांनी पुढाकार घेतला. त्यातून जमलेल्या सुमारे २ लाखांच्या निधीत बौद्धवाडीतील ५१ कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील मांडकी बुद्रुक येथे गेल्या महिन्यात कोरोनाने हाहाकार उडविला होता. गावात ८५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. एकाच गावात आढळणारी ही सर्वाधिक संख्या होती. यावर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने मोठ्या कसोशीने मात केली. गावात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कोरोना चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या भीतीमुळे बौद्धवाडीतील ग्रामस्थ सर्वजण घरी थांबले होते. परिणामी त्यांच्या आर्थिक उत्पन्नाची घडी विस्कटली होती. त्यांच्या मदतीसाठी बौद्धवाडीतील मुंबई मंडळ, तसेच स्थानिक दानशूर पुढे आले आहेत.
गरजू लोक महिनाभर घरीच थांबले, त्यांची वणवण होऊ नये, यासाठी अन्नधान्याची मदत करण्याचे ठरले.
सरपंच अनंत खांबे, उपसरपंच अविनाश पवार, संजय पवार, डॉ. श्रीधर पवार आदी विविध लोकांनी पुढाकार घेतला. ज्यांना शक्य आहे, त्यांनी सढळ हस्ते मदत दिली. गावातील मुंबईकारांनी सढळहस्ते आपआपल्या परीने मदत दिली. जमलेल्या सुमारे २ लाखांतून जीवनाश्यक वस्तू घेतल्या. त्यामध्ये साखर, तेल, कडधान्य, डाळी, चहा पावडर आदी साहित्याचे वाटप केले. अजूनही गावातील गरजू कुटुंबांना अशाच प्रकारचे धान्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गावातील मंडळांचे पदाधिकारी पुढाकार घेऊ लागले आहेत.
---------------------------
कोरोना कालावधीत बौद्धवाडीत बाधित लोकांची संख्या जास्त होती. येथील अनेक लोकांची कुटुंबे ही त्यांच्या मजुरीवर अवलंबून आहेत. येथील लोक महिनाभर घरीच थांबले होते. त्यांच्या मदतीसाठी मुंबई मंडळासह अनेकांनी पुढाकार घेतल्याने ५१ कुुटुंबांना धान्य वाटप करता आले. याच पद्धतीने अजूनही गावातील आणखी गरजू कुटुंबांना अत्यावश्यक साहित्य देण्याचे नियोजन आहे.
- अनंत खांबे, सरपंच, मांडकी बुद्रुक
--------------------------------------
चिपळूण तालुक्यातील मांडकी बुद्रुक येथे गरीब व गरजूंना घरपट धान्य दिले जात आहे.