राजापूर (जि. रत्नागिरी) - स्थानिकांचा विरोध असतानाही केंद्र्र व राज्य शासनाकडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्यात असल्याच्या निषेधार्थ डोंगर तिठा ते चौकेदरम्यान रविवारी सकाळी चलेजाव संघर्ष यात्रा काढण्यात आली. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील चार किलोमीटरच्या या यात्रेला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नाणार परिसरातील १४ गावांतील जनतेचा १०० टक्के विरोध असतानादेखील केंद्र्र व राज्य सरकारने प्रकल्प लादला असून शिवसेनेने त्याविरोधात आवाज उठवलाआहे.रविवारी संघर्ष यात्रेत खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, आमदार उदय सामंत, संघर्ष समितीचे सचिव भाई सामंत यांसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.चौके येथे संघर्ष यात्रेचे सभेत रुपांतर झाले. या वेळी विनायक राऊत यांनी, हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. पुढील काळात प्रकल्पग्रस्त गाव ते रत्नागिरी अशी संघर्षयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली.
रिफायनरीविरोधात ‘चले जाव संघर्ष यात्रा’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:53 AM