रत्नागिरी : सध्या दुसरी लाट हळूहळू कमी होण्याची लक्षणे दिसत असली, तरीही अजून कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे अजूनही काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली राहण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत आली असली, तरी या वर्षी गणेशोत्सवात पुन्हा मुंबईकर मोठ्या प्रमाणावर गावाला येणार असल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील यांच्यासमोर दुसऱ्या लाटेतच वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
गेल्या वर्षी २३ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू झाले होते. ३ मार्चला काही अंशी त्यात शिथिलता येताच, कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतले ते काेरोनाची भेट घेऊनच. त्यामुळे जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला. त्यात गणेशोत्सवातही मोठ्या प्रमाणावर गावी आलेल्या गणेशभक्तांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला. याच काळात बंद असलेली कोकण रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहनांना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे गणपती उत्सवात कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला. अखेर शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या घटू लागली.
डिसेंंबरपर्यंत ही संख्या कमी होती. मात्र, जानेवारी, २०२१ मध्ये पुन्हा लाॅकडाऊन शिथिल झाले. जिल्ह्यांतर्गत बंदी उठल्याने सुमारे सात-आठ महिने घरात अडकलेल्या नागरिकांचा पर्यटन, अन्य कामांसाठी प्रवास वाढला. लोकांचे फिरणे वाढल्याने पुन्हा हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा होती. मार्चमध्येेे होळीच्या सणात पुन्हा गणेशोत्सव काळात वाढलेल्या कोरोना रुग्णवाढीची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित होते.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शिमग्याला सुरुवात होताच, चाकरमानी मोठ्या प्रमाणावर पुन्हा गावी परतले. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसला. वर्षभरात १० हजार असलेल्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एकदम दुप्पट झाली आणि गेल्या चार महिन्यांत यात जवळपास ५७ हजारांची वाढ झाली आहे. दर दिवशी सातशेपर्यंत असलेली रुग्णसंख्या आता ३०० वर आली असली, तरीही ही संख्याही लक्षणीय आहे. नवीन जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील यांनी महिनाभरात दुसरी लाट संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिवसाला १० हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाला करण्यास सांगितले आहे. मात्र, दुसरी लाट संपवितानाच ती लाट पुन्हा वाढणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी यांच्यासमोर राहणार आहे.