वनसंवर्धनाने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करणे शक्य
लाेकमत न्यूज नेटवर्क
प्रशांत सुर्वे
मंडणगड : तालुक्यातील वर्षानुवर्षे सुरू असलेली वनांची कत्तल पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. अतिवृष्टी, दरडी कोसळणे, वातावरणातील बदल, मोसमांची अनियमितता यांना कारणीभूत ठरलेल्या जंगलतोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत आहे. मंडणगड तालुका तर जंगलतोडीचा माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. तालुक्यातील नवनियुक्त वनपाल अनिल दळवी यांच्यासमोर आता वनसंवर्धनाचे आव्हान आहे.
अतिवृष्टीत म्हाप्रळ-भोर-पंढरपूर या राज्यमार्गावर पुणे जिल्हा हद्दीत २४ तासांत जवळपास ३० ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे रस्ते बाधित झाले, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. माेठ्या प्रमाणात हाेणारी वृक्षताेड याला कारणीभूत ठरत आहे. कोकण भाग हा सह्याद्रीच्या गर्द आणि हिरव्यागार जंगल भागासाठी प्रसिद्ध आहे, अनेक पर्यटन क्षेत्र पर्यटकांना खुणावतात. मग सरकारी पातळीवर कोकणासाठी पर्यटनदृष्ट्या गोवा राज्य धरतीवर पर्यटन विभाग म्हणून जाहीर करून विविध योजनांच्या माध्यमातून चालना देणे गरजेचे आहे, त्याद्वारे येथील नागरिकांसाठी पर्यटनातून रोजगारनिर्मिती होऊ शकते, येथील कोकणी माणसाला येथील नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर कोकणी शैली जगासमोर मांडता येऊ शकते. मात्र, गेल्या काही वर्षात माेठ्या प्रमाणात वृक्षांची ताेड करून डाेंगर उजाड केले जात आहेत.
काेकणाला निसर्गतः वृक्षांची साधनसंपत्ती मिळाली आहे, असे असताना मूठभर लोकांच्या व्यवसायाकरिता जंगलांची कत्तल करून भविष्य काय? कायद्यातील पळवाटा तयार करून जंगलतोडीला प्राधान्य देणे अयोग्यच, किंबहुना किटा व्यवसाय येथील प्रथम क्रमाकांचा व्यवसाय बनला आहे. वृक्षताेडीमुळे सह्याद्रीच्या कुशीतील मंडणगड तालुक्याची ओळख भविष्यात ओसाड सह्याद्री म्हणून होण्यास वेळ लागणार नाही. मागील दोन वर्षात तालुक्यावर ओढवलेल्या निसर्ग आणि ताैक्ते अशा दोन चक्रीवादळांच्या संकटानंतर तालुक्यात झालेल्या बागायती व जंगली वृक्षांचे नुकसान न भरून येणारे आहे. त्यानंतर वनविभाग, कृषी विभाग यांनी किती रोपांची नव्याने लागवड केली हा संशाेधनाचा विषय आहे. तालुक्यातील वनसंवर्धन करण्यासाठी वनपालांनी वनरक्षणाची मोहीम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक कार्यक्रमाची आखणी करणे गरजेचे आहे. नवनियुक्त झालेले वनपाल अनिल दळवी यांच्यासमाेर आता वृक्षताेड राेखण्याचे खरे आव्हान आहे.
---
तत्कालीन राज्य सरकारची दरवर्षी राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवडीची योजना होती. कोरोनात त्यात खंड पडला. तत्कालीन पाच वर्षांच्या कालखंडात मंडणगड तालुक्यात हजारो रोपांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यातील किती रोपांचे संवर्धन झाले आहे, याचा शाेध घ्यावा लागेल. लागवड केलेल्या रोपांचे ऑडिट वनविभागाने करणे गरजेचे आहे. दरम्यान, याच कालावधीत रोपांच्या लागवडीखाली आलेले क्षेत्र व वृक्षांचे तोड केलेले क्षेत्र याचा सरासरी ठोकताळा वनविभागाने जाहीर करावा, तोड झालेले क्षेत्र लागवडीपेक्षा तोडीचे क्षेत्र चार ते पाच पट अधिक असण्याची शक्यता आहे.