समीर चांदोरकर - सापुचेतळेभारतीय अर्थव्यवस्था मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहात आहे.काही ठिकाणी जमीन आहे तर पाणी नाही. काही ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी आहेत, पण शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्याच्याउलट मनुष्यबळ आहे. पण, ग्रामीण भागातील शेतकरी गरीब असल्याने त्याला शेतीसाठी लागणारे बियाणे, अवजारे, बैलजोडी विकत घेणे परवडत नाही. असे दृश्य जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे.आज बैलजोडी शेतीसाठी विकत घ्यायची झाल्यास किमान वीस हजार रुपये लागतात. जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यालाही वर्षाला दोन बैलासाठी वैरणीचा १० हजार रुपये खर्च होतो.शेतीसाठी लागणाऱ्या खताचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांच्या किमतीतही भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यातच शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्नही पूर्वीच्या तुलनेने कमी व्हायला लागले आहे. त्याचा परिणाम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर होत आहे.अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांना शेतीसाठी लागणारे खत, बी-बियाणे, बैल, अवजारे यांना लागणारा प्राथमिक खर्चही परवडणारा नसल्याचे समोर येत आहे. आज त्यांना शेती लावण्यासाठी त्यांना दुसऱ्या व्यक्तींवर त्यांच्या बैलजोडींवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी त्यांना एका जोतासाठी दिवसाकाठी ५०० रुपये मोजावे लागतात.वाघ्रट (ता. लांजा, लिंबूवाडी) येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र लोटणकर हे स्वत: शेतकरी आहेत. यावेळी त्यांनी आपल्या शेतात भाताची शेती केली आहे. ती दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून म्हणजेच त्यांनी दुसऱ्या व्यक्तीबरोबर ‘डालं’ केले आहे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या बैलजोडीवर (जोतांवर) त्यांच्या घरातील व्यक्तींसह आपली शेती लावायची. त्यानंतर त्या व्यक्तीची शेती लावण्यासाठी त्याला मदत करायची, अशी हमी देऊन एकमेकांची शेती लावण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात रूढ आहे. त्याचप्रमाणे स्वत: बैलजोडी बाळगणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. शेतीशिवाय अन्य कोणत्याही कामासाठी बैलजोडीचा आजकाल वापर होत नसल्याने बैल बाळगणे परवडत नाही.चांदोर येथे आपली शेती वाट्याने म्हणजे शेती दुसऱ्या व्यक्तीने करायची. त्यांचा पाव टक्के हिस्सा जमीनधारकाला द्यायचा, अशा पद्धतीने दिल्या आहेत. शेतीत राबण्यासाठी मजुरांची कमतरता हे त्याचे मुख्य कारण आहे.शेतीसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होत नाही. आजकालचा पाऊस लहरी झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत इतर फळझाडांची लागवड केली आहे.चांदोरचे माजी पोलीसपाटील बाबल्या बनकर (७९) यांच्या म्हणण्यानुसार तरुण पिढी हिरीरीने शेतीमध्ये रमताना दिसत नाही.सध्या ग्रामीण भागात शेतजमीन ओस पडल्याचे चित्र आहे. त्याऐवजी १०० टक्के अनुदान योजनेतून फळझाडांची लागवड करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र, ही योजना यशस्वी करतानाच सापुचेतळे, चांदोर भागातील शेतकऱ्यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत शंका व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे महागाईचे आव्हान
By admin | Published: July 20, 2014 10:36 PM