खेड : सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या फुरुस ते दापोली या प्रमुख राज्य महामार्गाची अवस्था धोकादायक बनली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. या विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी हे खड्डे त्वरित भरावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
वर्गखोल्या नादुरुस्त
राजापूर : तालुक्यातील २१ शाळांच्या ५५ वर्गखोल्या नादुरुस्त बनल्या आहेत. सध्या शाळा बंद असल्या तरीही नवीन शैक्षणिक वर्षात या शाळा सुरू होणार आहेत. या शाळांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी न झाल्यास विद्यार्थ्यांना वर्गात बसविणे धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष
राजापूर : उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली १९ एप्रिल रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
रस्त्याची दुरवस्था
राजापूर : तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाधित क्षेत्रात येणाऱ्या माडबन गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. या परिसरात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होत आहे. मात्र माडबन गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
आंबेडकर जयंती साधेपणाने
मंडणगड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही जयंती आंबेडकरी जनतेने अतिशय साधेपणाने घरगुती स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच राहून अभिवादन करण्याचे आवाहन केले जात आहे.
वृक्षांची बेसुमार कत्तल
आवाशी : खेड तालुक्यात सध्या दिवस-रात्र वृक्षांची कत्तल सुरू आहे. शेकडो ट्रक लाकूड साठा परजिल्ह्यात वाहतूक केला जात आहे. मात्र वन संरक्षणासाठी असलेल्या शासनाच्या वन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वृक्षतोडीमुळे निसर्गसौंदर्याला मोठ्या प्रमाणावर बाधा निर्माण होत आहे.
मच्छिमार संकटात
मंडणगड : वातावरणात सातत्याने होणारे बदल, त्यातच कोरोनाचे संकट आणि संभाव्य लॉकडाऊन त्यामुळे गेले वर्षभर संकटात असलेल्या मच्छिमारी व्यवसायावर पुन्हा नव्याने आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सध्या मच्छी सापडत नसल्याने बोटीवर काम करणारे नोकर आणि मच्छिमार हैराण झाले आहेत.
कोरोना जनजागृती
गुहागर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियमावलीचे नागरिकांनी पालन करावे, यादृष्टीने तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
गव्यांचा धोका वाढला
राजापूर : तालुक्यातील पांगरी खुर्द आणि परिसरातील गावांमध्ये गव्यांचा उपद्रव वाढला आहे. या गावांतील सुमारे १०० ते १५० काजूच्या झाडांची गव्यांच्या झुंडीने नासधूस केली आहे. या बागायतदारांचे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गव्यांच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उकाड्यात वाढ
रत्नागिरी : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उष्णता पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात ३१ ते ३३ अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाचा पारा गेला होता. मात्र या आठवड्यात उष्मा अधिकच वाढू लागला आहे. उष्णतेचा पारा ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.