रत्नागिरी : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा अर्थात भारतीय चंद्रयान ३ चा लॅंडिगचा क्षण जसाजसा जवळ येत होता, तसतशी उत्कंठा वाढत होती. अखेर चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडीग होताच शहरातील श्रीमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे विद्यार्थी, नागरिकांनी एकच जल्लोष केला. सर्व विद्यार्थ्यांनी हातातील राष्ट्रध्वज उंचावत ‘भारत माता की जय’ घोषणा दिल्या. तिरंगी फुगे अवकाशात सोडून आनंद साजरा केला. यावेळी सर्वांना पेढे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.
उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी चंद्रयान लॅंडिगचा सुवर्णक्षण पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. विविध शाळांमधील विद्यार्थी, नागरिक चार वाजलेपासून तारांगण येथे उपस्थित होते. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान ३ चे यशस्वी लॅंडींग होताच उपस्थितांना आनंद अनावर झाला. लॅंडिग बाबतची वैज्ञानिक माहिती प्रा. बाबासाहेब सुतार, प्रा. स्वप्नजा मोहिते या मराठी भाषांतर करून दिली.
यावेळी उदय सामंत फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगरसेवक निमेश नायर, शिंदे सेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, तालुका प्रमुख बाबू म्हाप, कांचन नागवेकर, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.