लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुलांना परीक्षा देताना त्रास हाेण्याची शक्यता अधिक आहे. वाढत्या तापमानाचा विचार करून दहावी, बारावीच्या परीक्षांच्या वेळेत बदल करून त्या सकाळ सत्रात घ्याव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दहावी व बारावीच्या परीक्षा अनुक्रमे २९ एप्रिल व २३ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यांत होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यांत कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणांचे तापमान ४० अंशांपेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलण्याबाबत शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री गायकवाड यांना पत्र दिल्याची माहिती शिक्षक भारती उर्दूचे प्रमुख कार्यवाह मुबीन बामणे यांनी दिली आहे.
कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागांतील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी आठ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती या पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे.