कडगाव : आगामी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण ही लढाई जिंकणार असल्याचा ठाम विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.वासनोली (ता. भुदरगड) येथे शेतकरी मेळावा व भुदरगड तालुका शेतकरी संघाच्या नूतन संचालकांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिनकरराव जाधव होते. यावेळी ‘बिद्री’चे माजी संचालक विजयसिंह मोरे, बाबासाहेब पाटील, बी. एस. देसाई प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखून सर्वसमावेशक पॅनेल तयार करू, तसेच वासनोली प्रकल्पासाठी प्रयत्नशील राहून केदारलिंग मंदिराला पर्यटनाचा ‘क’ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी सर्व सत्तास्थाने हाती असतानादेखील के. पी. पाटील यांनी स्वत:च्या स्वार्थासाठीच सत्तेचा वापर केला. विकासकामांपेक्षा प्रसिद्धी मिळविण्यातच जास्त वेळ खर्च केल्याचे सांगितले. माजी संचालक के. जी. नांदेकर म्हणाले, के. पी. पाटील यांना पराभव दिसू लागल्याने ते वाटेल तसे आरोप करीत आहेत. ते जनतेची फसवणूक करीत असून, येत्या बिद्रीच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांना पायउतार करेल. कार्यक्रमप्रसंगी भुदरगड तालुका शेतकरी संघाच्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल पांडुरंग पाटील, नंदकुमार ढेंगे व अंकुश चव्हाण, सरपंच लक्ष्मी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग पाटील, संचालक विजयसिंह मोरे, दत्तात्रय उगले, मारुती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
‘बिद्री’त परिवर्तन अटळ
By admin | Published: June 12, 2016 11:23 PM