रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथे विनापरवाना तसेच क्लोरल हैड्रेट ही नशाधारक पावडर मिसळून भेसळयुक्त अपायकारक माडीची विक्री केली. या प्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती.
या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी विजय जयसिंग पाचपुते (रा. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पाेलिसांनी प्रकाश रत्नू होरंबे (रा. पानवल जुगाईनगर, रत्नागिरी) आणि संजय एकनाथ शिवलकर (रा. मांडवी, रत्नागिरी) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी त्यांनी खेडशीनाका येथील विनापरवाना माडी केंद्रावर छापा टाकला होता. तेव्हा संशयितांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांनी ७,१५० रुपयांचा दंड आकारला होता. तसेच त्यांच्याकडील माडीपैकी २ लीटर माडी तपासणीसाठी पुणे येथील राज्य आरोग्य प्रयोगशाळा आणि म्हैसूर येथील खाद्य प्रयोगशाळेत पाठवली होती.
या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, संशयितांनी त्या माडीत क्लोरल हैड्रेट ही नशाधारक पावडर मिसळली हाेती. ती मानवी शरीरास अपायकारक असल्याचे माहीत असतानाही ग्राहकांना विक्री करत असल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य करीत आहेत.