कोकणातील व घाट विभागातील हवामान, जमीन व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन चारसुत्री भातशेती विकसित केली आहे. सन १९९३ ते १९९६ या हंगामात २०० आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर केलेल्या प्रयोगात सुत्र ३ व ४ वापरून सर्वसाधारणपणे सरासरी चार टन भात इतके उत्पादन आले व भात शेती किफायतशीर झाल्याचे सिध्द झाले आहे.
भाताच्या तुसामधील व पेंढ्यामधील पालाश व सिलिकाॅनचा फेरवापर व मर्यादित गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा वापर नियमितपणे केला तर बऱ्याच प्रमाणात रोग व किडीचा प्रतिकारक (औषधे न वापरता) होऊ शकेल व खाचरात जमिनीची उत्पादनक्षमता टिकवता येईल. महिला शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन वाढीची भरीव कामगिरी करून दाखवता येईल. कारण स्वयंपाकासाठी तुसाची शेगवडी वापरून रोप वाफ्यात टाकण्यासाठी राख उपलब्ध करून देता येईल. अप्रत्यक्षपणे वन संरक्षण होऊ शकेल. नियंत्रित लावणी करून युरिया ब्रिकेटचा वापर महिला कामगार सहजासहजी शिकतात व स्वतंत्रपणे करू शकतात. एकत्रितपणे संपूर्ण चारसुत्री भात शेती पध्दतीमुळे एकूण खर्चात बचत करता येईल.
शिफारशीपेक्षा ४४ टक्के रासायनिक खताची बचत होऊ शकेल. बियाण्याची ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकेल. त्यामुळे त्याच प्रमाणात रोप तयार करण्याचा, उपटण्याचा व लावण्याचा खर्च कमी होऊ शकेल. हेक्टरी रोपांची संख्या शिफारस केलेल्या रोपांच्या संख्येपेक्षा कमी केल्यामुळे लावणीत व काणी मजुरीत बचत होऊ शकते.
रासायनिक खताच्या कार्यक्षम वापरामुळे तणांचा त्रास कमी होतो व तण काढण्यासाठी लागणारी मजुरी वाचेल. थोडक्यात चारसुत्री भात शेतीमुळे हवा, पाणी, जमीन, जंगलातील झाडे या सर्वांचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण होऊन भात उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल. युरिया ब्रिकेट खताचा वापर केला तर ४०-४५ टक्क्यांपर्यंत मजुरीची बचत होते. ४४ टक्के कमी खत वापरून ३० टक्के कमी बी वापरून ५० टक्क्यांपर्यंत भाताचे व पेंढ्याचे उत्पादन वाढत आहे.