संदीप बांद्रे/ चिपळूण : दहा हजार रूपयात घरकूल व १७०० रूपयात शिलाई मशिन देतो असे सांगून येथील बचत गटाच्या शंभरहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माजी आमदार रमेश कदम यांनी गंभीरपणे दखल घेत महिलांसह सोमवारी पोलिस स्थानकात जाऊन या प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केली. याप्रकरणात लाखोंची फसवणूक झाली असून याबाबतच्या निवेदनात बीड येथील महाराष्ट्र क्रांतीसेना संस्थेवर कारवाईची मागणी केली आहे.
आर्थिक दृष्टया दुर्बल घटकाचे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शहर व परिसरातील बचत गटातील महिला या फसवणूकीला बळी पडल्या आहेत. डिसेंबर महिन्यात उषा अशोक पवार, सरिता संजय पवार, दिक्षा दिपक माने व पूजा धिरज नलावडे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बचत गटाच्या महिलांची बैठक घेतली. महाराष्ट्र क्रांतीसेना संस्थेच्या अंतर्गत शासनाच्या योजनेतून शिलाई मशीन व ज्यांना निवारा नाही, अशांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवले. घरकुलासाठी दहा हजार रूपये तर शिलाई मशिनसाठी १७०० रूपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार बचत गटातील महिलांनी त्या अमिषाला बळी पडत पैसे भरण्याची सहमती दर्शवली. त्यासाठी काही महिलांनी स्वतःचे दागिणे बॅंकेत व पतसंस्थेत गहाण ठेवून, विकून पैसे त्या संस्थेच्या बँक खात्यात जमा केले.
गेले अनेक दिवस याविषयी चौकशी केल्यानंतरही शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत, लवकरच तुमच्या घरकुलाचे पैसे मंजूर झाल्याचे पत्र येईल. असे एकच उत्तर त्यांच्याकडून वारंवार मिळत होते. यातील काही महिलांचा विश्वास जपण्यासाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. मात्र घरकुलाची चौकशी केल्यावर उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. काही महिलांनी वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांना दमदाटी करण्यात आली. परंतू अद्याप एकाही महिलेला घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने आमची फसवणूक झाली असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रमेश कदम यांच्यासह दिलीप माटे, हिंदुराव पवार, विलास चिपळूणकर, रंजिता ओतारी, दिपमाला नाटुस्कर, सुनंदा पवार, काजल चौगुले, छाया माने, सुवर्णा पवार, दिपाली माने, वैशाली नलावडे, सुजाता नलावडे, अंकिता पवार, लक्ष्मी मोहिते, शोभा पवार, ललिता पवार, अश्विनी माने, जयश्री चौगुले आदी महिला उपस्थित होत्या.