दापोली : कोकणातील पारंपरिक मच्छीमार समाजाला अनेक समस्या भेडसावत असून, ते मेटाकुटीला आले आहेत. वारंवार येणारी वादळे, त्यातच आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट यामुळे मच्छीमार बांधव त्रस्त झाला आहे. परंतु या मच्छीमार बांधवांकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कोळी महासंघाचे युवक अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी केला आहे.हर्णै बंदरात कोळी महासंघातर्फे कोळी बांधवांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पांडू पावसे, तालुका अध्यक्ष गजानन चौलकर, हर्णै पाजपंढरी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन किसान चौगले, दापोली पंचायत समिती सभापती रऊफ हजवाने, डी. एम. वाघे, माजी सरपंच अस्लम अकबानी उपस्थित होते.कोकणातील अनेक मासेमारी बंदरात अद्ययावत जेटी नाही, फिश मार्केट नाही, पायाभूत सुविधांचा अभाव आहे. परराज्यातील बोटींचे आक्रमण मच्छिमारांना भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे, परंतु मच्छिमारांसाठी काहीही करायची राज्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण अनेक मच्छीमार संस्था, मच्छीमार बांधवांना भेटलो. समस्या जाणून घेतल्या. सगळ्याच बंदराची खूप दयनीय अवस्था असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांना एक न्याय आणि कोळी बांधवांना वेगळा न्याय, हा अन्याय यापुढे आम्ही सहन करणार नाही. राज्य सरकारने कायदा न केल्याने कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यातील बोटी येथे येऊन मासेमारी करतात. दुसरीकडे याच राज्यातील पारंपरिक मच्छिमारांना मासे मिळत नाहीत.
या समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी केंद्र सरकारकडे आपण निवेदन देऊ. कोणीही राजकारण न करता केवळ मच्छीमार म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महेंद्र चौगुले, नंदकुमार चौगुले, पंढरीनाथ चौगुले, हरेश्वर चौगुले, प्रभाकर पटेकर, महादेव चौगुले, नरेश पालेकर, दिलीप चौगुले, पुनम पावसे, पुष्पा पावशे, जयश्री दोरकुळकर, जया दोरकुळकर, शैलेश कालेकर, अंकुश चौलकर, यशवंत खोपटकर उपस्थित होते.