रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत असताना त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात होणे गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात आपल्या जिल्ह्यातून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हा तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुक्रवारी (१० मार्च) रत्नागिरी तालुक्यातील वाटद-मिरवणेतील शिर्केवाडी येथे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी तहसीलदार रत्नागिरी शशिकांत जाधव, पुणे येथील मराठा विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र सावंत, वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष नाना विचारे, अविनाश पाले, नारायण शिर्के, आबासाहेब सुर्वे उपस्थित होते.मंत्री उदय सामंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन आपल्या हस्ते होणे, हा आपल्या आयुष्यातील सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा हा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाला ३५० वर्षे होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी ३५० कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये आमदार निधीतून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.मंत्री सामंत म्हणाले की, आपण पालकमंत्री झाल्यानंतर मारुती मंदिर येथे शिवसृष्टी साकारण्यात आली. ती बघण्यासाठी महाराष्ट्रातील लोक येथे येतात. आता पुढीच्या एक वर्षात रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे सर्वात मोठे ग्रंथालय आणि संशोधन केंद्र हे रत्नागिरी येथे होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व्हावे, मंत्री उदय सामंतांनी मदतीचेही दिले आश्वासन
By अरुण आडिवरेकर | Published: March 10, 2023 4:43 PM