चिपळूण : तालुक्यातील सती भाग्योदयनगर व रावतळे विंध्यवासिनी येथे चोरट्याने भरदिवसा बंद सदनिका फोडून ४ लाख ९७ हजार ८५० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या घटनांची चिपळूण पोलीस स्थानकात नोंद झाली असून, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा चोरट्यानी डोके वर काढले आहे.याबाबतची फिर्याद डॉ. अंजली संजीव शारंगपाणी (६२, रा. विंध्यवासिनी, रावतळे) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी बंद सदनिकेच्या दर्शनी सेफ्टी डोअरचे कुलूप कापून मुख्य दरवाजाची कडी उचकटली व आत प्रवेश केला. यानंतर बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकर उचकटून आतील २ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
ज्यामध्ये २५ हाजर रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या, ४५ हजार रुपये किमतीची कर्णफुले असा दागिन्यांचा समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेची माहिती डॉ. शारंगपाणी यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ ते ४ च्या सुमारास घडली.तसेच सती भाग्योदयनगर येथे चोरीची दुसरी घटना घडली. याबाबतची फिर्याद हेमंत हनुमंत बादल (२७, मूळ रा. साकुर्डी, ता. कºहाड) यांनी दिली. बादल हे सती भाग्योदयनगर येथील साई संस्कृती विहारच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत भाड्याने राहात होते. या सदनिकेच्या दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटातील २ लाख ४७ हजार ८५० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
यामध्ये ६५ हजार ३०० रुपये किमतीचे मंगळसूत्र, ५० हजार रुपयांचा सोन्याचा हार, २५ हजार रुपये किमतीचा गोफ, २५ हजार रुपये किमतीच्या रिंग जोड्या, १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेडन, ५ हजार ३०० रुपयांचे मंगळसूत्र, १ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण या दागिन्यांचा समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हेमंत बादल यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.धागेदोरे सापडले नाहीतउपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्यासह पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपासणीच्या दृष्टीने पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. या दोन्ही घटनांच्या तपासासाठी रत्नागिरीतून विराट नामक श्वानाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, कोणतेही धागेदोरे सापडले नाहीत.