चिपळूण : आपण चिपळूण दौऱ्यावर काही तासात जाणार आहोत, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगताच त्यांनी काही मिनिटातच चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री कसा असावा याचे उदाहरण मुख्यमंत्री शिंदे असून, ते चालते फिरते मंत्रालय असल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री सामंत यांनी गुरुवारी (१३ ऑक्टोबर) रात्री चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी नगर परिषद प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केंद्राच्या उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर पालकमंत्री सामंत यांनी राज्य सरकारकडून अडीच कोटींचा निधी तत्काळ जाहीर केला. तसेच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. चिपळूणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही दीड कोटींचा निधी, तर नगर परिषदेला एक कोटींचा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले.यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, उमेश काटकर, भरत गांगण, निहार कोवळे, नगर अभियंता परेश पवार, अभय सहस्रबुद्धे, विजय चितळे, रामदास राणे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे आदी उपस्थित होते.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर'
By संदीप बांद्रे | Published: October 14, 2022 6:08 PM