राजापूर : कोराेना महामारीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना, चिखलगाव ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत फंडातून ५० टक्के अनुदानावर ग्रामस्थांना विविध प्रकारचे सुमारे ७०० किलो भातबियाणे उपलब्ध करून दिले आहे. त्याचे वाटप करण्यात आले.
शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या ग्राम फंडाचा कसा योग्य विनियोग करता येतो, ते चिखलगाव ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. पावसाळी हंगामाला सुरुवात होत आहे, तर कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे सुरू असलेले लॉकडाऊन वाढत आहे, त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना होऊ नये, म्हणून चिखलगाव ग्रामपंचायतीने चांगली योजना गावासाठी राबविली. शासनाकडून मिळालेल्या ग्रामपंचायत फंडातून आपल्या ग्रामस्थांसाठी सुमारे ७०० किलो विविध प्रकारची भातबियाणे पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा शुभारंभ सरपंच अंजली अनिल जड्यार, उपसरपंच योगेश नकाशे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे, संघमित्रा बेतकर, अनिता ठिक, भिकाजी कुडकर, रुणजी पळसमकर, माजी सरपंच तुकाराम कुडकर, ग्रामसेविका घुमे व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांकडून भातबियाण्यांचे अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर, ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन ते अर्ज गोळा केले आणि नंतर भातबियाण्यांचे वाटप करण्यात आले.