चिपळूण : पर्यटनाबाबत मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को - आॅप. सोसायटी, चिपळूणतर्फे बालदिनानिमित्त साने गुरुजी उद्यान येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. स्पर्धा चार गटात घेण्यात आली. पहिल्या शिशू गटासाठी नदीतील होडी, तळ्यातील बदक, रस्त्याच्या बाजूला असलेली झाडाखालील झोपडी, गट दुसरा पहिली ते चौथीसाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी मी आंधळ्यांना मदत करतो, मी संगणक हाताळतो, नदीकाठचे एक लहान खेडे, गट तिसरा पाचवी ते सातवीसाठी मी ताईबरोबर शाळेत जातो, मी माझ्या मित्रांबरोबर विज्ञान प्रयोग करतो, चिपळुणातील पूरस्थिती एक गंमत, तर चौथी ते आठवीसाठी आम्ही स्वच्छता अभियानात सहभागी होतो, आमच्या शाळेतील माध्यान्ह भोजन, आम्ही पर्यटनाला जातो, आठवडा बाजार असे गटनिहाय विविध विषय देण्यात आले होते. प्रत्येक गटातील ३ क्रमांकाना मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच २ क्रमांकाना उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल १८ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थेच्या दि. २७ ते २९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या बॅकवॉटर फेस्टिव्हल व क्रोकोडाईल सफारी या कार्यक्रमात होणार आहे.संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज, रवींद्र धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य इब्राहीम दलवाई, रेहाना दलवाई, सज्जाद काद्री, समीर कोवळे, आलीम परकार, समीर जानवलकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. शाहनवाज शाह यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वार्ताहर)शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.बॅकवॉटर फेस्टिव्हल व क्रोकोडाईल सफारी कार्यक्रमात होणार स्पर्धेचे बक्षीस वितरण.चार गटात घेण्यात आली स्पर्धा.चिपळूण शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी केले स्पर्धेचे आयोजन.१८ डिसेंबर रोजी होणार निकाल जाहीर.
सानेगुरुजी उद्यानात मुले रंगली चित्रकला स्पर्धेत
By admin | Published: November 17, 2014 9:56 PM