चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली आहे. यासाठी २५ प्रगणक काम करत आहेत.पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, चिपळूण केंद्र शासनामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानुसार तालुक्यात २०व्या पशुगणनेचे काम सुरु आहे. या पशुगणनेची मुदत दि. ३१ मार्चपर्यंत असल्याने कर्मचाऱ्यांना गणना पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. हे काम करण्यासाठी कर्मचारी पूर्णपणे गुंतले आहेत. कमी कालावधी असल्यामुळे ही गणना कशी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या पशुगणनेसाठी तालुक्यातून २५ प्रगणक काम करत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त ताण पडत आहे. सुरुवातीला ही गणना सुशिक्षित तरुणांकडून केली जाणार होती. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांनाच ही गणना करण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.पशुगणनेसाठी आॅनलाईन पद्धत अमलात आल्यानंतर त्यांच्या प्रक्रियेसाठी २०१८ हे वर्ष उजाडले आहे. आॅनलाईनसाठी टॅबचे वितरण, तर नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण यामुळे प्रक्रियेला वेळ लागला. डिसेंबर २०१८पासून हे काम सुरु झाले आहे.
आज भौगोलिक परिस्थिती पाहता बराच भाग हा ग्रामीण असल्यामुळे त्या ठिकाणी आॅनलाईन पध्दतीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच या गणनेची माहिती ग्रामीण भागात म्हणावी तशी पोहोचली नसल्याने या पशुगणनेची नोंदी करताना कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पशुगणनेचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.