लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ४९६ वर पोहोचला आहे. त्यापैकी तब्बल ९७३ जणांवर घरात उपचार सुरू आहेत. बहुतांशी ठिकाणी बेड हाऊसफुल्ल असल्याने लॉकडाऊन कालावधीत जे म्हटले जायचे ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ तेच आता जणू उपचाराच्या बाबतीत आरोग्य विभागाला म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात दररोज शेकडो रुग्ण वाढत आहेत. त्यातच मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, अनेक तरुणांचा यात बळी गेला आहे. आतापर्यंत तालुक्यात १५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातच रविवारी एकाच दिवशी तब्बल २०० जणांना कोरोना झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. सध्या येथे १,४९६ जण बाधित असून, यातील १०८ जणांवर कामथे, ७७ जणांवर वहाळ कोविड सेंटर, ४० जणांवर पेढांबे कोविड सेंटर, चौघांवर लोटे कोविड सेंटर, ४७ जणांवर श्री हॉस्पिटल, ३६ जणांवर संजीवनी हॉस्पिटल, ३० जणांवर लाईफकेअर हॉस्पिटल, ५ जणांवर जिल्हा रूग्णालय, ६९ जणांवर डेरवण हॉस्पिटल, ९ जणांवर आयुसिद्धी हॉस्पिटल, १४ जणांवर पुजारी हॉस्पिटल, ९ जणांवर सावर्डे चिरायू हॉस्पिटल तर ९७३ जणांवर घरात उपचार सुरू आहेत. ५७ जणांना अन्यठिकाणी हलविण्यात आले आहे.
आतापर्यंत तालुक्यातील ५ हजार ११० जणांना लागण झाली असून, त्यातील ३ हजार ४५९ जण बरे झाले आहेत.
सद्यस्थितीत तालुक्यात एकूण ४६६ बेड उपलब्ध आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालय, वहाळ समाज कल्याण वसतिगृहात व मंदार एज्युकेशन सोसायटी येथे शासकीय स्वरूपात उपचार केले जात आहेत. कामथेतील १३० बेडसह ३०५ बेड उपलब्ध असून तेथे शासकीय दरात उपचार केले जात आहेत. यामध्ये ५२ ऑक्सिजन बेड, तर २० आयसीयू बेडचा समावेश आहे. याव्यतिरिक्त खासगी स्वरूपात १६१ बेड उपलब्ध असून त्यामध्ये २९ ऑक्सिजन बेड, तर ४६ आयसीयूबेड उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत वाढती रुग्ण संख्या व यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता ज्यांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवले जात आहे.
.................................
नवीन कोरोना केअर सेंटरसाठी तयारी
सध्या नगर परिषदेमार्फत ४० बेडचे पेड कोरोना केअर सेंटर एका रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू केले जाणार आहे. त्याच पद्धतीने मुस्लीम समाजातर्फे ३० बेडचे सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयाची मदत घेतली जात आहे. आमदार शेखर निकम व शासकीय यंत्रणा अशा खासगी सेंटरसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, अजूनही ऑक्सिजन व आयसीयू बेडचा तुटवडा कायम आहे.