चिपळूण : दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा विकण्यासाठी आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील दोघांसह आणखी एकाला ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. यातील एकाला शहरातील गोवळकोट रोड येथून ताब्यात घेतले.पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ही माहिती दिली. या तिघांकडून ८५ लाख ४८ हजाराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेले कर्ज चुकविण्यासाठी हा खटाटोप केल्याचे त्यानी पोलीस चौकशीत सांगितले.
याबाबत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापूरबावडी सर्कल येथील बस स्टॉपसमोर रोडवर एक इसम बनावट नोटा वटविण्यासाठी आला असल्याची माहिती घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वागळे युनिट पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचला.संजय गंगाराम आगरे (२९, रा. कळंबट, ता. चिपळूण) याला बनावट नोटांसह रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता मन्सूर हुसेन खान (४७, रा. बनमोहल्ला शिरळ, ता. चिपळूण) आणि चंद्रकांत महादेव माने (४५, रा. हाकीमजी रुक मानजी चाळ, कुर्ला) हे दोघेजण यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनाही पोलिसांनी अटक केली.
संशयित आरोपींनी काही बनावट नोटा छापून त्या बाजारात चालविल्याची शक्यता असून, पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले की, याप्रकरणी चिपळूण पोलिसांना कोणतीही माहिती नाही. परंतु एकाला गोवळकोट येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याहून अधिक माहिती नसल्याचे ते म्हणाले.साहित्य हस्तगतपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तीन संशयितांकडून ८५ लाख ४८ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले संगणक, प्रिंटर्स, मोबाईल फोन आदी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. आणखीही साहित्य मिळण्याची शक्यता आहे.