चिपळूण : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाले. यामुळे विरोधकांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणे हल्ले केले आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या घरांची जाळपोळ, व्यवसायाच्या ठिकाणी आग लावणे असे कृत्य केले आहे. विरोधकांनी असे कृत्य करून लोकशाहीची हत्याच केली आहे. या घटनेचा येथील भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. विध्वंसक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिपळूणच्या भाजप तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन देत केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध देशभरातून व्यक्त केला जात आहे. चिपळूण भाजपकडूनही त्याचा निषेध केला जात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद बोभसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरसेवक परिमल भोसले, रामदास राणे, प्रणय वाडकर उपस्थित होते.