चिपळूण : नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम चिपळूण पोलिसांनी अधिक तीव्र केली आहे. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल ११ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहर तसेच सावर्डे परिसरात ही कारवाई करण्यात आली. एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाईची मोहीम राबविल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक लॉकडाऊन सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर अद्यापही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने शासकीय निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिले आहेत. त्यामुळे चिपळूण बाजारपेठेतील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून, सकाळी ११ वाजेपर्यंत कोणतेही वाहन बाजारपेठ किंवा आजूबाजूच्या रस्त्यावर सोडले जात नाही. सर्व रस्तेच पोलिसांनी बंद केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेतच उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र, असे असले तरी चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातही नियमांची पायमल्ली करून काही दुकाने ११ नंतरही उघडी ठेवली जातात. त्यामुळे पोलिसांनी सलग गस्त सुरू केली असून, ११ नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत.
यावेळी मुश्ताक अहमद तांबे (गोवळकोट), नुरुद्दीन अब्दुल गफ्फार (गोवळकोट), राजेंद्र धोंडू देवळेकर (सावर्डे), मंगेश सुरेश सावर्डे (सावर्डे), अनंत शंकर पवार (कळंबस्ते), मुश्ताक जनुभा शेख (मुरदपूर), सतीश कृष्णद शिर्के (चिपळूण शहर), दयानंद वसंत कदम (चिवेली), महेश शंकर तांबीटकर (वालोपे), चंद्रकांत विष्णू चव्हाण (चिपळूण बाजारपेठ), सतीश मारुती भोसले (वालोपे) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिपळूण आणि सावर्डे पोलिसांनी ही कारवाई केली असून, यापुढेही दररोज पोलिसांची गस्त सुरू राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.