आॅनलाईन लोकमतचिपळूण , दि. ३0 : पावसामुळे चिपळूण नगर परिषदेच्या इमारतीला गळती लागली आहे. इमारतीच्या स्लॅबमधून पाणी झिरपत आहे. त्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. नगर परिषदेच्या स्थापनेपासून लावण्यात आलेला येथील भोंगा काढण्यात आला असून, या भोंग्याच्या कंपनामुळे स्लॅबला तडे गेले होते. गेले दोन ते तीन दिवस चिपळुणात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे नगर परिषद इमारतीच्या स्लॅबमधून पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे. हे पाणी खाली जमिनीवर पडत असल्यामुळे नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास होत आहे.
इमारतीचे दोन्ही जिने स्लॅबमधून गळणाऱ्या पाण्यामुळे पूर्णत: भिजले आहेत. जिने चढतानाही अंगावर पाणी पडत आहे. या पाण्यातूनच वाट काढत नागरिकांना कामासाठी प्रत्येक विभागात जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अशाचप्रकारे गेल्यावर्षीही पावसाळ्यात नगर परिषद इमारतीच्या स्लॅबमधून पाणी गळत होते. या गळतीबाबत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन इमारतीतील गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.